छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराचा पाणीप्रश्न सुटण्याच्या दृष्टीने एक दिलासादायक बातमी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या १२ जूनपासून शहराला नव्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टप्प्या-टप्प्याने वाढीव पाणी मिळणार आहे. हे वाढीव पाणी नव्या पाइपलाइनमधून वितरीत केले जाईल, तसेच सध्याच्या जलवाहिन्यांद्वारे जुन्या शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक सुधारण्यावर महानगरपालिका भर देणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बुधवारी बैठक घेतली. यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, १२ जूनला सुरुवातीला ५० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध होईल. त्यानंतरच्या काळात टप्प्या टप्प्याने हे प्रमाण १०० एमएलडीपर्यंत नेले जाईल. यामुळे पाणीपुरवठ्यांमधील अंतर कमी करण्याला प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल. सध्या ज्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, तो कमी केला जाईल. पाणी मिळण्यातील दिवसांचे अंतर कमी करून शहरवासीयांना दिलासा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे अमोल येडगे यांनी सांगितले.
PADS
पंधराशेची जलवाहिनी होणार सुरू
नवीन योजनेसाठी नक्षत्रवाडीच्या डोंगरावर एमबीआर (संतुलित जलकुंभ) उभारण्यात आले आहेत. तेथून शहराच्या वेगवेगळ्या भागांतील जलकुंभांना जोडण्यासाठी ११००, १५०० आणि २००० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये १५०० आणि २००० मिमीच्या जलवाहिन्या तातडीने सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वप्रथम १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यन्वित केली जाईल. त्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांत २००० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी सुरू करण्यात येईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions